पुणे, 6 एप्रिल 2023
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 76 दिवस बाकी आहेत; या पार्श्वभूमीवर योग विषयक जनजागृतीसाठी पुण्यातील आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने आज योग प्रात्यक्षिक आणि सरावाचे आयोजन केले होते.
पुण्यातील येवलेवाडी येथे सुरू झालेल्या निसर्गग्राम येथे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था व केंद्रीय संचार ब्यूरो यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी 7.00 वाजता आयुष मंत्रालयाच्या मानक ‘प्रोटोकॉल’नुसार सामूहिक योग प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी झाले होते.
केंद्रीय संचार ब्यूरो या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या विभागाच्या कलाकारांनी याप्रसंगी योग आधारित गीते तसेच शास्त्रीय नृत्य याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने यावेळी सर्व सहभागींना राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने भरड धान्यापासून तयार केलेली न्याहारी दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य होता.
***
CBCPune/Shilpa Nilkanth/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai