छत्रपती संभाजीनगर, दि. 31 ऑक्टोबर 2025
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या, केंद्रीय संचार ब्यूरोने आज छत्रपती संभाजीनगर व जळगाव येथे कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
छत्रपती संभाजीनगर येथे युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा समारोप शहागंज येथील उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.

याप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतला.

केंद्रीय संचार ब्यूरोच्या कलाकारांनी यावेळी सांस्कृतिक कार्यकमाचे सादरीकरण केले. ‘भारत माता की जय’, ‘सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे’, अशा घोषणा देत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, शहागंज येथे आली. तेथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास सर्वांनी अभिवादन केले.

उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची व स्वदेशी वस्तू वापराबाबत शपथ देण्यात आली. यावेळी खा. डॉ. भागवत कराड यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाची उपस्थितांना माहिती दिली.
जळगाव येथे देखील आयोजित पदयात्रेत विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. जळगाव महानगरपालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार स्मिता वाघ, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक उपस्थित होते. यावेळी सर्वांना राष्ट्रीय एकत्मतेची शपथ देण्यात आली व केंद्रीय संचार ब्यूरोच्या कलाकारांनी पथनाट्य सादर केले.

***
ShilpaPhopale/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
